Saturday, 21 December 2013

Lagnatali Deni Gheni.

लग्नातली देणी-घेणी

Chaturya Katha 1 - Lagnatali Deni Gheni

लग्नातली देणी-घेणी
उन्मत्तसिंग नावाचा एक अत्यंत जुलमी राजा होता. त्याच्या छळाला व अत्याचाराला कंटाळून त्याची प्रजा आपआपली गावे सोडून, दुसऱ्या राज्यात जाऊ लागली. त्याचा प्रधान चतूर व प्रामाणिक होता, पण राजाला काही सांगू जाणं, म्हणजे स्वत:चं मरण स्वत:च ओढवून घेण्यासारखं होतं. त्यामुळे राजाला ताळ्यावर कसं आणावं, हा त्याच्यापुढे प्रश्न पडला.
एकदा तो प्रधान शिकारीसाठी रानात बराच दूरवर गेला असता त्याला एका झाडाखाली जप करीत बसलेला साधू दिसला. प्रधानाने घोडयावरुन उतरुन व त्या साधूजवळ जाऊन त्याला नमस्कार केला असता साधूनं त्याला विचारलं, 'कोन तुम्ही ?'
प्रधान म्हणाला, 'मी या राज्याचा मुख्य प्रधान आहे.'
ते एकुण गोसाव्यान विचारलं, 'राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा स्थलांतर करीत असताना, ते केवळ उघडया डोळ्यांनी बघत राहण्यासाठीच तुम्ही प्रधान झाला आहात काय?
यावर प्रधान म्हणाला, गोसावीबुवा ! मग मीही तुम्हाला विचारतो की, राजाच्या जुलमाला कंटाळून प्रजा घरेदारे सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली असताना तुम्ही केवळ 'राम राम' म्हणत राहून स्वत:चीच मुक्ती साधणार आहात काय ? ज्या समाजाच्या जिवावर आजवर तुम्ही जंगलात त्याला या जुलुमजबरदस्तीतून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं हे तुमचं कर्तव्य नाही का?'
प्रधानाच्या या प्रतिप्रश्नान काहीसा ओशाळून तो गोसावी म्हणाला, 'प्रधानजी ! मला झेपेल अशी कोणतीही कामगीरी तुम्ही मजवर सोपवा. या राज्याच्या जुलमी राजाला ताळ्यावर आणण्यासाठी मी माझे प्राणही पणाला लावीन . सुचतो आहे का तुम्हाला एखादा उपाय?' तो गोसावी याप्रमाणे म्हणताच त्या चतुर प्रधानाच्या मनात काहीतरी कल्पना आली आणि त्याने ती हळूच त्या गोसाव्याला सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन देताच प्रधान तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी राजा उन्मत्तसिंगाचा दरबार भरला असता, एक सेवक आत आला आणि राजाला म्हणाला, 'महाराज ! पक्ष्यांची भाषा जाणणारा एक बैरागी बाहेर आला असून, तो आपली भेट घेऊ इच्छितो. त्याला आत पाठवू का?'
राजानं होकार देताच, आदल्या दिवशी प्रधानाला रानात भेटलेला तो गोसावी दरबारात आला व राजाला नमस्कार करुन म्हणाला, 'महाराज ! मी बहुतेक सर्व पक्ष्यांची भाषा जाणतो. मजकडून काही सेवा करुन घ्यायची असल्यास आपण ती घ्यावी. मला त्याबद्दल पैसे वगैरे काहीच नकोत.'
राजा प्रधानाला म्हणाला, 'प्रधानजी, आज संध्याकाळी आपण दोघे फ़िरायला जाऊ तेव्हा बैरागीबुवांनाही आपल्याबरोबर घेऊन जाऊ.' राजा असे म्हणाला व त्याने एका सेवकाला त्या गोसाव्याची राहण्या-जेवणाची चांगली व्यवस्था ठेवण्यास सांगितले.
संध्याकाळी फ़िरायला जाताना राजा व प्रधान यांच्याबरोबर अर्थातच तो गोसावीही होता. ते तिघे त्या राजधानीच्या शहराबाहेर जातात न जातात, तोच राजाने एका झाडाच्या फ़ांदीवर बसलेले पक्षी आपापसात चिवचिवत असलेले पाहिले. त्यांच्याकडे बोट दाखवून राजाने त्या गोसाव्याला विचारलं, 'बैरागीबुवा ! हे दोन पक्षी एकमेकांशी कय बोलत आहेत हो?'
त्या गोसाव्यानं त्या दोन पक्ष्यांच चिवचिवण थोडा वेळ लक्षपूर्वक ऎकल्याचा आव आणला आणि तो राजाला म्हणाला, ' महाराज ! ते दोन पक्षी एकमेकांशी जे बोलत आहेत, त्याचा अर्थ जर मी आपल्याला सांगितला, तर आपण मला जिवंत ठेवणार नाही.'
यावर राजानं अभय देताच तो गोसावी निर्भिडपणे म्हणाला, 'महाराज ! त्या फ़ांदीवरच्या दोन पक्ष्यांपैकी जो डाव्या बाजूला बसला आहे, त्याची मुलगी लग्नाची असून त्याने आपली मुलगी उजव्या बाजूला असलेल्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्या पक्ष्याकडे काढली. यावर वरपिता असलेला तो पक्षी त्याला म्हणाला, 'तुझी मुलगी मी सून म्हणून आनंदाने स्वीकारतो, पण मुलीबरोबर 'स्त्रीधन' म्हणून शंभर गावे आंदण द्यायची तुझी तयारी आहे काय?'
राजा आश्चर्यानं म्हणाला, 'अरे वा: ! असं म्हणतोय तो वराचा बाप ? मग वधूचा बाप घासाघीस करुन, आदंण म्हणून द्यावयाच्या गावांची संख्या पन्नास पाऊणशेवर आणू पाहत असेल नाही का?'
गोसावी म्हणाला, 'नाही महाराज! तिथे उलटाच मामला चाललाय. वधूपिता परराज्यातून उडून आलेल्या वरपित्याला म्हणतो आहे, अहो. शंभरच काय घेऊन बसलात, सध्याच्या राजाची जुलमी राजवट जर अशीच आणखी एक वर्षभर चालू राहिली, तर वर्षभरात पाचशे गावातले लोक आपली घरदारं सोडून परराज्यात रहायला जातील. मग ती ओस पडलेली पाचशेच्या पाचशे गावं माझ्या भावी जावयाला मी आंदण म्हणून देईन. मात्र तुमच्या मुलाचं व माझ्या मुलीचं लग्न सध्या जमवून ठेवायचं आणि वर्षभरानं लावायचं.'
वास्तविक त्या दोन पक्ष्यांच्या चिवचिवण्याचा हा सोयीचा व केवळ काल्पनिक अर्थ त्या गोसाव्याने प्रधानाने आदल्या दिवशी त्याला केलेल्या मार्गदर्शनानूसार राजाला सांगितला, पण राजाला तो खरा वाटून, तो एकदम शरमून गेला. त्या दिवसापासून त्याच्यात बराच फ़रक पडला व तो प्रजेचं अपत्यवत पालन-पोषण करु लागला.
नविन/लोकप्रिय निवडक १०

No comments:

Post a Comment